Wednesday, May 22, 2019

गरज आहे, मराठी भाषा संवर्धनाची...!

 गरज आहे, मराठी भाषा संवर्धनाची....!

 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकता मराठी...
धर्म, पंथ, जात, एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी..

      कवी सुरेश भट यांनी वरील कवितेच्या ओळीतून मराठी भाषेचे सत्य आणि महत्व विषद केले आहे. पण या सत्याला आणि महत्त्वाला आपण किती महत्व देतो याविषयी संशोधन करण्याची वेळ सद्यस्थितीत आपल्यावर येऊन ठेपली आहे. मराठी भाषेच्या इतिहासात डोकावल्यावर देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाल्याचे नमूद केलेले आढळते. मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व बोलीभाषा म्हणून किमान सातशे वर्ष सातत्याने वापरात आहे. मराठी भाषकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना होऊनही आज साठ वर्ष होत आले पण मराठी भाषेच्या विकासाला व संवर्धनाला हवी तशी गती व दिशा मिळालेली वाटत नाही.
इंग्रजी भाषाचे आकर्षण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होते की काय अशी भीती सातत्याने व्यक्त केली जाते. खरेतर मराठी भाषेच्या संवर्धनाचे अनेकानेक मार्ग खुले झाले आहेत. विविध ज्ञानशाखांमधील ज्ञान आज मराठीत येत आहे. मोबाईल व संगणकीय तंत्रज्ञानही मराठीत उपलब्ध होत आहे तरीही मराठी भाषा संवर्धनात आपण मागे पडत चाललो की काय असे वाटते.

म्हणून मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी खालीलप्रमाणे महत्त्वाची उपायोजना करणे आवश्यक वाटते. गरज आहे स्वतःपासून सूरवात
करण्याची...


1) आपल्याला सगळ्यांनाच आपली मातृभाषा अगदी बालपणापासून अवगत असते, पण काळाच्या दोघात आपल्याला अवगत असलेल्या भाषेचा विकास करण्याकडे आपले दुर्लक्ष होते. खरेतर भाषा विकसन ही प्रक्रिया काळासोबतच निरंतन प्रवाही रहाणारी प्रक्रिया आहे. ही प्रवाही साधना स्वतः करीत रहाणे ही काळाची गरज आहे. यामुळे भाषा विकासाबरोबर भाषासंवर्धन ही होईल.

2)  व्यक्तीच्या जीवनात भाषा विकास ही वेगवेगळ्या वयोगटात आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर होत असते. या प्रत्येक टप्प्यावर माणसाला आपल्या भाषेचा झालेला विकास, आपल्या व्यवहारावर असणारा भाषेचा प्रभाव पडताळून पाहणेसाठी नित्य श्रवणातून बहुश्रुतता, नित्य वाचनातून चिंतन व मनन, शंकांसाठी चर्चा करणे. चिंतन मननातून लेखन करणे, अभिव्यक्त होणे गरजेचे आहे.यावरून भाषा संवर्धनात आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याची स्वतःला निश्चिंत जाणीव होईल.

3) मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड नाहीसा करणे हे प्रत्येकाने कर्तव्य समजावे. प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीने मराठी भाषेबद्दल रास्त अभिमान बाळगून तिची जोपासना व संवर्धनसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे.