जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - ओझरखेड, ता.दिंडोरी, जि.नाशिक
शाळेत राबविलेल्या सहा उपक्रमांची थोडक्यात माहिती-
उपक्रमाचे नाव :- दप्तरमुक्त शाळा (1)
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कितीही काटेकोरपणे नियम पाळण्याचा प्रयत्न केला तरी दप्तर थोडं जडच होत असते. यावर उपाय म्हणून जि.प.प्राथमिक शाळा ओझरखेड येथे आठवड्यातून एक दिवस म्हणजे दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम जुलै 2018 पासून सुरू करण्यात आला आहे. वर्गात वेळापत्रकातील तासिकानुसारच तास घेतले जातात पण दप्तराचा वापर नाही.
या उपक्रमाचे खालीलप्रमाणे फायदे:-
1) दर शनिवारी शाळेमध्ये मुलांच्या विविध कलागुणांची अभिव्यक्ती तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांचे गुणदर्शन होण्यासाठी कविता, गाणे, गोष्टी, पाढे पाठांतर, अवांतर वाचन, योग, कवायत, खेळ यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न केले गेलेत.
2) विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती क्षमतेत वाढ झाल्याचे आढळून आले. काही मुलं वर्गात बोलायला लाजतात, घाबरतात पण आता वर्गात आणि वर्गाच्या बाहेरही आत्मविश्वासाने बोलतात.
3) विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये असलेल्या विविध सुप्त गुणांचे दर्शन होऊ लागले. यामुळे मुलं स्वतःहून सांगतात की, सर, मी एक गाणे म्हणतो, कविता म्हणतो, गोष्ट सांगतो, आम्ही नाटिका सादर करतो…. याप्रमाणे विद्यार्थी जेव्हा एखादे गाणे सादर करतात त्यावेळी शिक्षकाला जाणीव होते आणि सहजपणे उच्चारतात, “अरे वा..!
याचा आवाज तर खूप चांगला आहे”. विद्यार्थ्यालाही या कौतुकामुळे प्रोत्साहन मिळते. पूर्वी मुलांना बळजबरीने सादरीकरणास बोलवावे लागत होते, आता मात्र मुलं स्वतःहून पुढे येतात.
4) विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संघ प्रवृत्ती, सहकार्य यासारख्या सामाजिक मूल्यांची वाढ होत आहे. त्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळत आहे.
5) या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा ताण कमी झाला. एक दिवस जरी दप्तर आणले नाही तरी सोमवार ते शुक्रवार पर्यंतच्या दप्तर ओझ्याचा शीण कमी झाल्याचा आनंद मुलांना नक्कीच होतोय.
6) शनिवार हा आवडता वार होतो. अध्ययनाचा फार तणाव नसतो किंवा कंटाळवाणे वाटत नाही. शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध कलागुण बघायला, ऐकायला तसेच अनुभवायला मिळतात त्यामुळे शाळेत तसेच वर्गात चाकोरीबद्धता वाढत नाही.
उपक्रमाचे नाव:- सूत्रसंचालन (2)
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास. यानुसार शिक्षण म्हणजे बालकांच्या बुद्धीवर ज्ञान बिंबवण्याची प्रक्रिया नाही तर बालकांच्या जन्मजात व निसर्गदत्त अंतर्गत शक्तींचा किंवा गुणांचा अविष्कार करून त्यांचा सर्वांगिण विकास करणे म्हणजे शिक्षण होय.
बुद्धी, विचार, तर्क, कल्पना, विश्लेषण, संश्लेषण, आकलन, उपयोजन, रसग्रहण, रसास्वाद अशा अनेक शक्ती कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाला निसर्गातून मिळालेल्या असतात, शक्तींना चालना देणे व त्यांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय.
यानुसार पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित होणे, सभाधीटपणा वाढणे, व्यक्त होता येणे, लिहिते होता येणे, संघवृत्ती व सहकार्यशीलता वाढीस लागणे इत्यादी उद्देश साध्य होण्यासाठी जून 2018 पासून या शाळेत ‘सूत्रसंचालन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
अ) आदर्श परिपाठाचे सुंदर सूत्रसंचालन:-
वर्ग व शालेय आवाराची स्वच्छता करून शालेय कामकाजाची जरी सुरुवात होत असली तरी खरी सुरुवात परिपाठाने सुरू होते. ही सुरुवात आनंददायी, प्रेरक, मूल्यवर्धित व्हावी यासाठी सुंदर, आदर्श परिपाठाचे सादरीकरण विद्यार्थी करतात सोमवारी इंग्रजी, मंगळवारी हिंदी, यानुसार क्रमाने इयत्ता निहाय वारनिहाय प्रत्येक वर्गातील दहा विद्यार्थ्यांचा गट परिपाठाचे सादरीकरण करतात. दर दिवशी राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान नियमित असते. प्रार्थना वारनिहाय निश्चित केलेली असते. दिनविशेष, पंचांग, सुविचार, म्हण, बोधकथा या बाबींचा शोध वर्तमानपत्र व संस्कारदीप मधून विद्यार्थी स्वतः करून घेतात. सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न तयार करतात. तारखेनुसार पाढा म्हणतात. बातम्यांचे वाचन करतात. पसायदान नंतर दोन मिनिटांचे मौन धारण करून विद्यार्थी त्यादिवशी नवीन ज्ञान मिळविण्यासाठी सज्ज होतात. या सर्व बाबींसाठी वर्गनायक सूचना देतो व गटातील सहकारी विद्यार्थी परिपाठाचे सादरीकरण करतात.
ब) शालेय व सहशालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणे:-
शासन परिपत्रकान्वये शाळेत राष्ट्रपुरुष/थोरपुरूष यांची जयंती/पुण्यतिथी साजरी करणे, राष्ट्रीयदिन साजरे करणे बंधनकारक केले आहे. करिता अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. एक विद्यार्थी सूत्रसंचालक, एक अनुमोदक, एक आभार प्रदर्शक म्हणून भूमिका पार पाडतात. उर्वरित सहकारी विद्यार्थी, प्रतिमाची मांडणी, पूजा साहित्याची तयारी करणे, चटई टाकणे साऊंड सिस्टिमची मांडणी व इतर व्यवस्था करणे, यासारखे कामे पार पाडत असतात. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे सर्व विद्यार्थ्यांमधून तसेच विद्यार्थ्यांच्या या सहमतीने एकाची निवड करून दिले जाते.
याप्रमाणे विद्यार्थी प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन उत्कृष्टपणे करतात. अंमलबजावणीसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थी घेत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळाल्याचा आनंद होतो.
उपक्रमाचे नाव:- मराठी श्रुतलेखन (3)
वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याकडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही पाठातील कोणत्याही परिच्छेदाचे हळुवार वाचन केले जाते. विद्यार्थ्यांनी परिच्छेदाचे एकेक वाक्य ऐकून लिहायचे. लेखन झाल्यावर पाठातील ज्या पानावरील परिच्छेद असतो त्याचा पान क्रमांक सांगितला जातो. विद्यार्थी त्या परिच्छेदावरून केलेले श्रुतलेखन स्वतः तपासतात. विरामचिन्हांच्या चुका शोधतात. शब्दांचे रस्व, दीर्घ, उकार, वेलांटी व जोडशब्द चुकले असल्यास त्या शब्दांना गोल करतात. चुकलेले शब्द दुरुस्त करून त्याचे दहा वेळा लेखन करतात.
या उपक्रमाचे फायदे:-
1)
लक्षपूर्वक श्रवण करण्याची सवय लागते.
2)
आकलन शक्तीचा विकास होतो.
3)
आशयज्ञानात वृद्धी होते.
4)
विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळतो.
5)
वाचन व लेखनात सुधारणा होते.
6)
स्वतःचे लेखन स्वतः तपासल्याने विद्यार्थी आनंदी होतात. त्याच्या आत्मविश्वासात वाढ होते
7)
अचूक व शुद्धलेखनाची सवय विकसित होते.
उपक्रमाचे नाव:- स्वप्रश्ननिर्मिती (4)
ज्ञानरचनावादात शिक्षकांनी (सुलभक) विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून, त्याची दैनंदिन अनुभवांशी सांगड घालून विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञानाची निर्मिती करणे ही ज्ञानरचनावादाची दुसरी पायरी आहे. या ज्ञानरचनावादी तत्वाचा उपयोग स्वप्रश्ननिर्मिती या उपक्रमासाठी आम्ही केला आहे.
या उपक्रमात आमच्या वर्गाच्या कोणत्याही विषयाचा पाठ शिकवल्यानंतर पाठाखालील दिलेल्या ज्ञानावर आधारित उपयोजित स्वाध्याय सोडवतात. याशिवाय पाठातील आशय अथवा घटक यावर स्वतःचे प्रश्न तयार करतात.
मराठी विषयासाठी एका वाक्यात उत्तरे लिहा, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा, शब्दांचा वाक्यात उपयोग करा, विराम चिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा, संवाद लिहा, कल्पनाविस्तार करा, यासारखे प्रश्न तयार करतात व त्यांची उत्तरेही लिहितात.
विज्ञान विषयासाठी एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागा भरा, कारणे लिहा, हा आकृती काढून नावे द्या, द्या यासारखे प्रश्न तयार करतात. प्रश्न निर्मिती करताना अडचण आल्यास सुलभकाची मदत घेतात.
या उपक्रमाचे फायदे:-
1) कोणत्याही पाठावर स्वतः प्रश्न तयार करत असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्या पाठाचे अथवा घटकाचे आपोआप वाचन होते. वाचनाचा सराव होतो.
2) विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न निर्मितीचे कौशल्य विकसित होते.
3) स्वतः तयार केलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहितांना विद्यार्थ्यांना आनंद होतो त्यामुळे स्वाध्याय लिहिण्याचा कंटाळा वाटत नाही.
4) विद्यार्थ्यांमधील स्वयंअध्ययनाची क्षमता विकसित होते.
5) या उपक्रमामुळे ज्ञान, आकलन क्षमता विकसित होते.
6) लेखन व वाचन कौशल्याचा विकास होतो.
उपक्रमाचे नाव:- आनंददायी वाढदिवस (5)
दिंडोरी तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावातील आमची शाळा ओझरखेड. शाळेत येणाऱ्या 90% विद्यार्थ्यांचे पालक मोलमजुरी करतात. कुटुंबाचे पालन पोषण करणे हेच त्यांचे परम कर्तव्य. म्हणून सतत कष्टत राहणाऱ्या खेड्यातील अशा माणसांना आपल्या मुलांचे वाढदिवस कोणत्या तारखेला येतो याचे विस्मरण होणारच. आठवण झालीच तरी त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाचे ना कौतुक ना नवलाई. अशा मुलांच्या बाल मनावर याचा विपरीत परिणाम होऊ नये तसेच त्यांनाही आनंद मिळावा म्हणून आमच्या शाळेत सर्व मुलांचे वाढदिवस साजरे केले जातात.
परिपाठात त्या दिवसाच्या तारखेनुसार ज्या विद्यार्थ्यांना वाढदिवस असतो त्यास स्टेजवर बोलावून घेतले जाते. सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचेकडून सामूहिकरित्या शुभेच्छा दिल्या जातात. काही मुलं आपल्या मित्रांच्या वाढदिवसासाठी त्याला कळू न देता केक, चॉकलेट, फुगे, भेटवस्तू आणतात. वर्ग सजवतात आणि धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करतात. सर्व शिक्षकांना सहभागी करून घेतले जाते.
या उपक्रमाचे फायदे:
1) या उपक्रमापूर्वी काही विद्यार्थ्यांना त्याच्या वाढदिवसाची तारीख माहीत नसायची. आता मात्र स्वतःच्या जन्म तारखेबरोबरच मित्राचे जन्म तारीख लक्षात ठेवतो.
2) वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे मुलगा-मुलगी असा लिंगभेद कमी होण्यास मदत होत आहे
3) विद्यार्थ्यांमधील एकमेकांविषयी आदर, प्रेमभाव, माणुसकी, करुणा वाढीस लागून संवेदनशीलता, सहनशीलता, सहकार्य, नेतृत्व, एकसंघता या सामाजिक मूल्यांचा विकास होण्यास मदत होत आहे.
उपक्रमाचे नाव:- वर्तमानपत्राचे वाचन (6)
वाचनाने माणूस समृद्ध होतो यानुसार वाचनाने विद्यार्थी समृद्ध व्हावेत, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, शब्दसंग्रह व सामान्यज्ञान वाढावे, त्यांना व्यक्त होता यावे, त्यांच्यातील मूलभूत वाचन क्षमता विकसित व्हावी या उद्देशांच्या पूर्तीसाठी वर्तमानपत्रांचे वाचन हा उपक्रम सुरू करण्यात आला. 19 जानेवारी 2019 च्या शनिवारी दप्तर मुक्त शाळा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील मूलभूत वाचन क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनात साठी देण्यात येणार होते. ग्रंथालयातील पुस्तके काढून आणण्यासाठी चार विद्यार्थ्यांना ऑफिसात पाठवले होते. त्यातील दोन विद्यार्थी काही पुस्तके घेऊन मैदानात आली. उर्वरित दोन विद्यार्थी ऑफिसात नेमके काय करत आहेत हे पाहण्यासाठी ऑफिसात जाऊन डोकावले, बघतो तर काय ? दोन्ही मुलं टेबलावर असलेले वर्तमानपत्र वाचत उभी दिसली. मला बघितल्यावर त्यांनी टेबलावर वर्तमानपत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मी तात्काळ त्यांना सूचित केलं, “अरे बाळांनो, वाचा वाचा आणि सर्वांना आजच्या ठळक बातम्या ही सांगा”..! मुलं परत पेपर वाचण्यात दंग झाले.
या प्रसंगावरून माझ्या डोक्यात एक छानशी कल्पना आली. आणि त्याचे रूपांतर या उपक्रमात झाले. त्यादिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्तमानपत्र वाचण्यासाठी दिले. त्यांनी स्थानिक बातम्या, राष्ट्रीय बातम्या, शब्दकोडे, बाल जगत, परिपाठ, क्रीडा, जाहिरात या घटकांचे कुतूहलाने तसेच ऐटीत वाचन केले. विद्यार्थ्यांना एक आगळावेगळा अनुभव मिळाला.
विद्यार्थ्यांचे वाचन झाल्यानंतर वर्तमानपत्र संदर्भात, वर्तमान पत्र म्हणजे काय ? त्यांची नावे त्याच्यात अंतर्भूत असणारे घटक, वर्तमानपत्र वाचनाचे फायदे याबाबत माहिती देऊन अवांतर वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. दुसऱ्या दिवसापासून शाळेत सर्व शिक्षकांनी मासिक वर्गणी जमा करून सकाळ हे दैनिक वर्तमानपत्र सुरू केले. दररोज येणाऱ्या वर्तमानपत्राचे वाचन सर्व विद्यार्थी लहान वाचनातून अथवा मोठ्या सुट्टीत करतात. पेपर वाचनातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग सामान्य ज्ञान परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना होत आहे.
No comments:
Post a Comment