नवोपक्रम


 नवोपक्रम

 मला अधिकारी व्हायचंच..!

  
शाळेचे नाव:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-ओझरखेड
केंद्र:- वणी (मुले)
बीट:- वणी
ता.:- दिंडोरी
जि.:- नाशिक





शाळेविषयी थोडक्यात माहिती-
शाळेचा पत्ता:-  मु.पो.ओझरखेड, ता.दिंडोरी ,जि.नाशिक
शाळेची स्थापना:-  01.09.1955
शाळेचे व्यवस्थापन:-  जिल्हा परिषद
शाळेचे माध्यम:-  मराठी
शाळेचा प्रकार:-  उच्च प्राथमिक ( 1ली ते 7 वी)
शाळेचा UDICE:-  27200410201


नवोपक्रमाचे नाव:- मला अधिकारी व्हायचंच…!

Ø नवोपक्रमाची गरज:-

             स्पर्धा परीक्षा म्हणजे उज्वल भविष्याचे प्रवेशद्वारच. परंतु याच स्पर्धा परीक्षांबाबत आपल्याकडील विद्यार्थ्यांना ऐनवेळी माहिती मिळते, थोड्या कालावधीत कशीबशी तयारी करतात त्यामुळे हवे तसे यश मिळत नाही. शिवाय स्पर्धा परीक्षाबाबत त्यांना योग्य अचूक मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचा पाया कच्चा राहतो परिणामी हे शिवधनुष्य पेलण्यात बहुतेक विद्यार्थी सपसेल अपयशी ठरतात.हाच धोका लक्षात घेऊन  आपल्या विद्यार्थ्यांचीही अशी फसगत होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची शालेय जीवनातच ओळख व्हावी यासाठीमला अधिकारी व्हायचंच”..!  हा अभिनव उपक्रम सुरू करण्याचे निश्चित केले.
         आपल्या जीवनामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे प्रत्येक युवक-युवतीचे स्वप्न असते. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग उपलब्ध आहे. आपल्यातील क्षमता  आणि कौशल्यांच्या जोरावर स्पर्धा  स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांनी या स्वप्नाला गवसणी घातल्याचेही उदाहरणे आहेत. खरेतर स्पर्धेच्या या युगात आपली गुणवत्ता सिद्ध  करूनच नोकरी मिळण्याची हमी आहे. जर विद्यार्थी म्हणून आपल्याकडून हे झाले नाही तर शिक्षण घेऊनही बेरोजगार होण्याची वेळ आपल्यावर येणार आहे याचा प्रत्यय पदोपदी येत आहे. या पार्श्वभूमीचा विचार करून हा उपक्रम शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे.


Ø नवोपक्रमाची उद्दिष्टे:-

1)    स्पर्धा परीक्षांची ओळख प्राथमिक शिक्षणस्तरावरुनच होणे.
2)     विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ होणे.
3)     विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागणे.
4)     अवांतर वाचनाची गोडी निर्माण होणे.
5)     विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व समजणे.
6)     ज्ञान, आकलन, अभिव्यक्ती, निर्णय क्षमता, निरीक्षण, आत्मविश्वास, ध्येय निश्चिती या क्षमतांचा विकास होणे.
7)     क्रमिक पाठ्यपुस्तकातील घटकांचे, आशयाचे दृढीकरण होणे.

       
Ø नवोपक्रमाची कार्यवाही:-
            हा उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या उपक्रमात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर 100 गुणांच्या सामान्य ज्ञानावर आधारित चाचणी घेतली जात आहे.  वर्षअखेरीस सर्व महिन्यातील चाचण्यांचे गुण एकत्र करून सरासरीच्या आधारे सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ‘Excellent Achievement Award’ ने गौरविले जाणार आहे. स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवरील प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यावर भर दिला जात आहे. दैनंदिन परिपाठात सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात.
         शाळेतील शिक्षक परिपाठ सुरू होण्यापूर्वी ग्रीन बोर्डवर 10 प्रश्न लिहितात. हे प्रश्न सामान्य ज्ञान 5 ते 7 च्या क्रमिक पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित असतात.परिपाठाच्या वेळेस सर्वांसाठी हा ग्रीन बोर्ड विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्यातील प्रश्न क्रमांक विचारले जातात. विद्यार्थ्यांकडून आलेल्या बरोबर असलेल्या उत्तराची नोंद संबंधित प्रश्नाखाली केली जाते. त्या 10 प्रश्नातील ज्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांकडून मिळाले नाही त्या प्रश्नाचे उत्तर परिपाठ संपल्यानंतर सहकारी शिक्षक नोंदवतात. सर्व प्रश्नांची उत्तरे नोंदवल्यानंतर सदर ग्रीनबोर्ड दर्शनी भागात ठेवला जातो. 5 ते 7 चे विद्यार्थी लहान अथवा मोठ्या सुट्टीत ग्रीनबोर्डवरील प्रश्नोत्तरे त्यांच्याकडील सामान्य ज्ञान वहीत लिहून घेतात. अशाप्रकारे दररोज दहा अथवा अधिक प्रश्नोत्तरांची नोंद विद्यार्थी घेत असतात. महिना अखेरीस 200 ते 300 प्रश्नांचा संग्रह विद्यार्थी करतात. याच प्रश्नांवर आधारित महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी 100 गुणांसाठी 50 प्रश्नांचा चाचणी पेपर घेतला जातो.
        सामान्य ज्ञान वाढीसाठी शाळेत शिक्षकांच्या स्वखर्चाने सकाळ या दैनिक वर्तमानपत्राचे वाचन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान ब मोठया सुट्टीत मुलं वर्तमानपत्राचे वाचन करतात. काही प्रश्नांच्या शंका संदर्भात विद्यार्थी शिक्षकांचे मार्गदर्शन घेत असतात.
   Ø    नवोपक्रमाची सद्यस्थिती:-
      सदरचा उपक्रम जानेवारी 2019 पासून या शाळेत राबविण्यात येत आहे. या उपक्रमास विदयार्थ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत मराठी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे अभ्यास विषयांचे ज्ञान दृढ होण्यास मदत होत आहे. करिता उपक्रमाची अंमलबजावणी नियमितपणे सुरु आहे.
        Ø    नवोपक्रमाचे यश:-

1)     विद्यार्थी शालेय अभ्यासाबरोबरच आवश्यक सामान्यज्ञान मिळवू लागले आहेत.
2)     विद्यार्थी स्मार्ट होऊ लागले आहेत.
3)     या उपक्रमास विद्यार्थ्यांचा निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार प्रतिसाद मिळत आहे.
           हा अभिनव उपक्रम राबवणारी नाशिक जिल्ह्यातील ओझरखेड ही पहिली शाळा ठरली आहे.
    

No comments:

Post a Comment