ऐ मेरे वतन के लोगोजरा आखं मे भरलो पानीजो शहीद हुए है उनकीजरा याद करो कुर्बानी.....
गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेले हे देशभक्तीपर गीत आजही हृदयाला स्पर्श करून जाते. गाणे ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात. डोळ्यासमोर साक्षात रणभूमीत शत्रूचा फडशा पाडून, त्यांचे तळ नेस्तनाबूत केल्यानंतर त्या ठिकाणी तिरंगा रोवून सलामी देणारे वीर जवान दिसतात. शेवटची घटका जवळ येऊनसुध्दा वीर जवान हसत हसत या भारत भूमीला वंदन करताना दिसतात. रणभूमीवर रक्ताचे पाट वाहत असूनसुध्दा विजयाचा आनंद साजरा करताना दिसतात .अशा या निधड्या छातीच्या जवानांची आहुती, त्यांचे शौर्य, धैर्य,त्याग, बलिदान याचा भारतीयांना विसर पडू नये असा अनमोल संदेश या गीतातून व्यक्त होत आहे.
प्रत्येक भारतीयांच्या रोमारोमात, नसानसात हे गाणे कोरले आहे हे सूर्याइतके सत्य आहे. शिवाय लतादीदींचे शेकडो गाणे काळजाचा ठाव घेणारी आहेत. पैकी हे गाणे माझे खूपच आवडीचे आहे कारण या गीतात भारतीय वीर जवानांची शौर्यगाथा वर्णन करून राष्ट्रभक्तीचा संदेश संपूर्ण भारतीयांना दिलेला आहे. शिवाय या गाण्याचे शब्द खूप मार्मिक असल्याने ऐकणारा तात्काळ भावुक होतोच.कवी प्रदीप यांची प्रभावी शब्दरचना, सी.रामचंद्र यांचे समर्पक संगीत आणि लतादीदींचा अद्वितीय स्वर ....अशा त्रिवेणी संगमामुळे या गाण्याने इतिहास घडवला.
मला आजही चांगलं आठवतं माध्यमिक शिक्षण घेत असताना आम्ही दोन वर्ष एनसीसी(भारतीय छात्र सेना) मध्ये सहभागी होतो. सन 1987- 88 मध्ये एच.ए.एल.ओझर, नाशिक येथे दहा दिवसांसाठी एनसीसी चा कॅम्प गेला होता. त्यावेळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एच.ए.एल.कॉलेजमधील एका मुलीने हे गीत गायले होते. हे गीत ऐकून खूपच प्रभावित झालो. एकता और अनुशासन हे घोषवाक्य असलेल्या एनसीसी मुळे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ही मूल्ये रूजू लागली यामुळेच हे गाणे खूप भावले.
खरे तर, हे गीत ऐकले तेव्हा कोणी गायले,का गायले वगैरे बाबत काहीच कळत नव्हते त्यावयात. पण हळुहळु वय वाढत असताना विचाराच्या कक्षाही रुंदावल्या. त्यानुसार या गाण्याचा खोलवर असा अर्थ उमजत गेला. गाणे कळायला लागले. गायक माहित व्हायला लागलेत. गायकांच्या आवाजातील माधुर्य समजायला लागले. तेव्हा कुठे या गाण्याची पूर्ण माहिती मिळाली.
देशभक्तीपर आधारित हे गीत कवी प्रदीप यांनी इ.स.1963 साली भारत-चीन युद्धानंतर या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिले.
कवी प्रदीप यांना रामलीला मैदानावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमत्त भारतीय फिल्म उद्योगातर्फे आयोजित संगीत संध्येच्या उद्घाटनासाठी एक गीत लिहावे अशी विनंती निर्माते मेहबूब खान यांनी केली होती. हे गाणे प्रदीप यांना जेव्हा सूचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथेच पडलेल्या एका रिकाम्या सिगारेटच्या पाठको-या भागावर त्यांनी हे गाणे लिहिले.
27 जानेवारी 1963 रोजी सर्वप्रथम रामलीला मैदानावर लतादीदींनी हे गीत गायले. या कार्यक्रमाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन व सर्व केंद्रीय मंत्री हजर होते. शिवाय चित्रपट सृष्टीतील दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, राज कपूर, देव आनंद व गायक मोहम्मद रफी हे उपस्थित होते. लतादीदींच्या सुमधुर कंठातून भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहणारे हे गीत ऐकून जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होतेच पण अनेक श्रोते अक्षरशः रडत होते.
अगदी आज सुद्धा हे गीत ऐकल्यानंतर तमाम भारतीयांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहात नाहीत. करिता गानसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लतादीदींना सलाम.
आणि दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....!
श्री.विश्वास पाटोळे
पंचवटी, नाशिक