Monday, April 19, 2021

 

                         यशोगाथा

श्री.विश्वास राघो पाटोळे
पदवीधर शिक्षक,
जि.प.प्राथ.शाळा- ओझरखेड
ता.दिंडोरी, जि.नाशिक
मो.क्र : 8007974560
Blogvishwaspatole.blogspot.com

 

शिक्षक तुमच्या दारी...!

Online/Offline शिक्षणाबरोबरच गृहभेटीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

   

     कोविड-2019 च्या पार्श्वभूमीमुळे 16 मार्च 2020 पासून सर्वत्र शाळा बंद आहेत.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले पण अद्याप शाळा भरली नाही आणि सद्यस्थिती पहाता कधी सुरू होतील माहीत नाही. अशा परिस्थितीत शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे  शिक्षण सुरू गरजेचे होते.
         शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रियेतूनच शिक्षण चांगल्याप्रकारे होते.असं माझं ठाम मत आहे. बाकीचे सर्व पर्याय शिक्षणाला पूरक साधने म्हणून नक्कीच उपयुक्त ठरतात.म्हणून मुलांपर्यंत पोहचून शिक्षण कसं देता येईल.असा विचार मी करत होतो आणि ठरवलं की मुलांना प्रत्यक्ष भेटायचं.मात्र हे सर्व शासनाचे नियम पाळून करावं लागणार होते.यासाठी खालीलप्रमाणे उद्दिष्टये निश्चित केली.विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे. Online/offline साधनाद्वारा विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवणे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययानासाठी मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता विकसित करणे. अध्ययनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करणे. विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी स्वाध्याय पुस्तिका सोडवून घेणे. Online Test घेणे. विद्यार्थांच्या अध्ययनातील अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील बुधवार व शुक्रवार या दोन दिवशी गृहभेट घेणे.     

         Online च्या माध्यमातून मुलांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न शासन व शिक्षण विभागातील सर्व घटक करीत आहेत. परंतू हे शिक्षण देताना मर्यादा येतात. अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. पालक दिवसभर घरी नसतात. सायंकाळी कामावरून घरी आल्यावर मुलांना अभ्यास बघायला मिळतो. काही पालक मुलांना मोबाइल देत नाहीत. या आणि अशा अनंत अडचणी ग्रामीण भागात आहे. शहरी भागातील विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध असूनही त्यांचे Online शिक्षणात मन लागत नाही.

           माझ्याकडे या वर्षी सातवीचा वर्ग आहे. वर्गाची पटसंख्या 16 असून  10 विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल आहेत. त्यांचा WhatsApp ग्रुप तयार केला असून दररोज PDF/Video द्वारा अभ्यास दिला जात आहे. यात स्वनिर्मित PDF तसेच Video चा सुध्दा समावेश आहे.दीक्षा अ‍ॅप विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केले आहे परंतू ग्रामीण भागात रेंज कमी असल्याने त्यातील व्हिडिओ डाऊनलोड होण्यास अडचण येते. म्हणून दररोज “टिलीमिली” आनंददायी शिक्षणाचे वेळापत्रक शेअर केले जाते. विद्यार्थी त्याचाही लाभ घेत आहेत. विद्यार्थी सूचनेनुसार अभ्यास पूर्ण करून ग्रुपवर शेअर करतात.सदर अभ्यास तपासून पुन्हा ग्रुपवर विद्यार्थ्यांना पाठविला जातो. अचूक अभ्यास पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.यामुळे मुलं चांगला प्रतिसाद देत आहेत.

 राज्य शैक्षणिक संशोधनव प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडील शैक्षणिक दिनदर्शिका WhatsApp ग्रुपवर शेअर केलेली आहे. सप्टेंबर पर्यंतच्या पाठ्यक्रमावर आधारित खासगी स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना केले आहे. याशिवाय काही गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पूरक शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.

         शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण कंटाळवाणे वाटू नये यासाठी Zoom meeting  व WhatsApp video call द्वारा मार्गदर्शन केले जात आहे. यातून विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधता आल्यामुळे आनंद मिळत आहे.

                  आठवड्याच्या  दर शनिवारी  20 गुणांची साप्ताहिक ज्ञानगंगा ऑनलाईन चाचणी दिली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे Android मोबाईल आहेत, त्या विद्यार्थ्यांना या चाचणीचा लाभ होत आहे. या चाचणीत ज्या विद्यार्थ्यांना 17 पेक्षा जास्त गुण मिळतात त्यांना ओझरखेड शाळेमार्फत एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जात आहे. प्रमाणपत्र मिळत असल्याने विद्यार्थी उत्साहाने चाचणी सोडवतात.साप्ताहिक ज्ञानगंगा ऑनलाईन चाचणी ही केवळ माझ्या वर्गापुर्ती मर्यादित न ठेवता नाशिक जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील विद्यार्थीही ही चाचणी सोडवत आहेत.या चाचणीची Link शिक्षकांच्या विविध ग्रुपवर शेअर केली जाते. 

       माझ्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधे मोबाईल आहेत, अशा विद्यार्थ्यांना आतापावेतो घेतलेल्या चाचणीतील एकूण प्रश्नांच्या  संकलनाची  PDF तयार करून त्याच्या प्रिंट काढून घरपोहोच दिल्यात. साधे मोबाईल असणारे विद्यार्थी Online विद्यार्थ्यांसमवेत अध्ययनात समान पातळीवर राहतील यासाठी हा प्रयत्न.!

           ज्या 6 विद्यार्थ्यांकडे साधे मोबाईल आहेत त्यांना दररोज voice call च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे.

         Online/Offline शिक्षणाबरोबरच आठवड्यातून दोन दिवस सामाजिक आरोग्याची काळजी घेऊन लेकरांना गृहभेटीतून वैयक्तिक मार्गदर्शन केले जात आहे. तो विद्यार्थी मग मळ्यातील असो या गावातील. कधी घराच्या ओटयावर तर कधी गावातील पारावर आमची गट शाळा भरते. मार्गदर्शन केलेल्या घटकाची नोंद केली जात आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी स्वतंत्र असल्याने त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार आवश्यक मार्गदर्शन करणे सोयीचे होते. ज्यांच्याकडे डिजिटल साधने उपलब्ध आहेत त्यांनाही वैयक्तिक मार्गदर्शन केल्याने आनंदी होत आहेत.

                                           

      
                         
                     
                 
     



         लॉकडाऊनची सद्यस्थिती विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यासाठी पूरक आहे. ही संधी म्हणून आपणही त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून कसे शिकावे  Learning to learn याचे मार्गदर्शन सध्या मी करत आहे. यासाठी विशिष्ट पाय-यानुसार समजपूर्वक वाचन कसे करावे आणि हे वाचन स्वयंअध्ययनासाठी किती आवश्यक आहे याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष मार्गदर्शनातून करत आहे.  विद्यार्थ्यांना या कृतीसाठी छोटे-छोटे आव्हान दिल्यास ते पूर्ण करताना विद्यार्थी कार्यमग्न होत आहे. शिवाय आव्हान पूर्ण केल्याचा एक प्रेरक आनंद मिळतो. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनात तंत्रज्ञानाची जोड दिल्याने अध्ययनाची परिणामकारकता वाढत आहे.
 
         विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भेटीमुळे अध्ययनातील अडचणीबाबत विद्यार्थी मनमोकळेपणाने बोलतात. त्यामुळे त्यांच्या शंका किंवा अडचणी सोडविणे सोपे होते. स्वयंअध्ययनासाठी मार्गदर्शक सूचना देणे शक्य होते. शिक्षक आपल्या दारी येऊन समजून सांगतात याचाही आनंद विद्यार्थ्यांना सुखावून जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवण्यात यश मिळाले. एकही विद्यार्थी शाळाबाह्य नाही. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागली. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागली. अध्ययनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सवय लागली.
 
         सध्या सर्वत्र धुव्वाधार पाऊस होत आहे तरीही मळ्यात राहणारे तसेच परगावी गेलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली जात आहे. शाळेपासून बरेच लांब आणि मळ्यात माझे घर आहे तरीही आमचे सर येथे आले, ही विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या मनात असलेली भावना त्यांच्या डोळ्यात दिसते. एका विद्यार्थ्याला मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही वाडी-वस्ती तसेच परगावी गेलेल्या मुलांच्या घरी जात आहेत याबाबत  पालक खूप समाधान व्यक्त करतात.
 
         विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासतांना तसेच मार्गदर्शन करतांना विद्यार्थी सूचनांनूसार अभ्यास करतात की नाही याची खात्री करण्यासाठी पालक सुध्दा सहभागी होतात. गावातील एका विद्यार्थ्याच्या घरी जात असताना एक कौतुकास्पद प्रसंग नजरेत आला. एका ओट्यावर पाच मुलं अभ्यासात गुंग होते. पायरीवर मनिषाताई बसलेल्या दिसल्या. गंमतीने मी विचारले की, तुम्हीही अभ्यास करतायंमनिषा ताई हसतच म्हणाल्या,"नाही सर,अभ्यासात मस्ती होऊ नये म्हणून मी बसले." आणि हे ही सांगायला विसरल्या नाहीत की, मी येथे असो किंवा नसो ही मुलं रोज येथे अभ्यासाला बसतात. अशा प्रतिक्रिया ऐकून आपल्या कार्यात पालक सहकार्य करत असल्याचे समाधान मिळाले.
 
         उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमचे प्रेरणास्थान दिंडोरी गटाचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री.बी.डी.कनोज साहेब,आमचे मार्गदर्शक वणी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्री.सी.बी.गवळी साहेब, आमचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री.पवार सर व श्री. बिरारी सर...या सर्वांचे अचूक मार्गदर्शन लाभत आहे. शिवाय पालकांच्या सहकार्यामुळे नवी उर्जा व दिशा मिळत आहे.
==========================================================================

 


No comments:

Post a Comment