ऑनलाईन शिक्षणपद्धती...
दिनांक -16-06-2020
चिंता ...विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची
भय ....संसर्गजन्य कोरोनाचे, आणि
अनेक अडचणी...ऑनलाईन शिक्षण पद्धतीत.
दिसतोय या सर्वांचा एकच परिणाम
होतेय सर्वांची फक्त घुसमट.
कोणताच पर्याय सर्वमान्य नाही..........
सद्यस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही जुलमी कोरोना ने शिरकाव केला
आहे. अशा भयावह परिस्थिती शाळा भरवली जाणार नाही हे सत्य आहे. आरोग्याच्या सर्व
सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तरी संपर्कातून होणाऱ्या या संसर्गजन्य आजारापासून
रक्षण करण्याची जबाबदारी कोणीही घेऊ शकत नाही.
यापार्श्वभूमीनुसार अजून काही दिवस तरी शाळा
सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही.मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे कसे होणार? हा
प्रश्न सर्वांसमोर समस्या म्हणून निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन
महिन्यांपासून ( मे महिन्याची सुट्टी वगळता) विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून,
शैक्षणिक वातावरणापासून दूर आहे हा चिंतेचा विषय आहे. अशावेळी विद्यार्थ्यांमध्ये
पठारावस्था येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मानसिकतेत बदल होऊ शकतो. शिवाय पालक व
विद्यार्थ्यांना याचीही जाणीव आहे की आरटीई कायद्यानुसार विद्यार्थी पास झाला नाही
तरी आणि शाळेत गेला नाही तरी त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. म्हणून
पालक ही बिनधास्त आणि विद्यार्थी ही स्वच्छंदी आणि मुक्तपणे वावरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात यामुळे बाधा निर्माण होऊ शकते. अशा
परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय तरी कोणाकडे उपलब्ध
नाही.
हे मात्र नक्की आहे की ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबत तेही जिल्हा परिषदांच्या
शाळा संदर्भात शहरीभाग, ग्रामीणभाग व
अतिदुर्गमभाग या वर्गीकरणानुसार विचार केला तर पहिले दोन्ही भाग वगळता तिसऱ्या
भागात म्हणजेच अतिदुर्गम भागाच्या गावातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.
जीवन जगण्यासाठी मोल-मजूरीतून चरितार्थ चालवणे हाच काय नित्यक्रम. अशा सर्वच
पालकांकडे स्मार्टफोन नाही शिवाय संबंधित गावात नेटवर्क सुस्थितीत नाही. साधा
व्हॉइस कॉल करण्यासाठी टेकड्यांचा आधार घ्यावा लागतो. अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण
पद्धती राबवणे शक्य नाही. शासनच फक्त यावर उपाययोजना करू शकते.
पण यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवू नये असा विचार केला तर
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. 15 जून रोजी मा. मुख्यमंत्री व शिक्षण
मंत्री यांनी शैक्षणिक कामकाज सुरू करण्याबाबत वेळापत्रक दिले आहे. या
वेळापत्रकानुसार ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये शाळा सुरू करण्याबाबत सूचित केले आहे. पण
तोपर्यंत निम्मे शैक्षणिक वर्ष संपलेले असेल.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे
शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण देणे आवश्यक आहे.
शहरी व ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देणे शक्य होईल पण अतिदुर्गम भागात
शक्य होणार नाही. तेथे ऑफलाईन शिक्षण म्हणजेच साध्या मोबाईलद्वारे पालकांशी तसेच
विद्यार्थ्यांची संपर्क करून अभ्यास देणे शक्य होईल पण या ऑनलाईन/ऑफलाइन शिक्षण
पद्धतीमुळे नक्कीच सर्वत्र समानता येणार नाही. अडचणी येतील पण हे ही नसे थोडके....
असे समजून या सर्व अडचणींवर आमचे शिक्षक नक्कीच मात करण्याचा प्रयत्न करतील. त्या
संदर्भात मात्र विरोधासाठी विरोध करू नये असे वाटते.
****************************************
मागील
मार्च-एप्रिल महिन्यात मुलांच्या काळजीपोटी प्रशासन, शिक्षक व पालक यांनी Learning From Home च्या माध्यमातून ज्ञान प्रवाह सुरू
ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला होता. यात विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा हे मुळीच
अपेक्षित नव्हते. मुलांनी घरातच सुरक्षित राहावे. LOCKDOWN
च्या काळात घरी बसून कंटाळवाणे वाटू नये म्हणून थोडासा अभ्यास करावा
ही माफक अपेक्षा होती. तरी मात्र या ऑनलाईन अभ्यासावर मात्र प्रचंड टीका झाली. ही
टीका होत असताना काही टीकाकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाजूने उभे राहिले,
काही टीकाकार अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले तर काही
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाच्या बाजूने उभे राहिले. वरिष्ठांकडे तक्रारी
गेल्या.मग फतवा निघाला की, प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणतेही ऑनलाईन अभ्यास अथवा
कोर्स सुरू करू नये. या कळीच्या मुद्यावर साधक-बाधक चर्चा करत-करत मार्च व एप्रिल
महिना संपला. 1 मे पासून विद्यार्थ्यांना अधिकृत सुट्टी लागल्यामुळे चर्चा/ टीका
बंद झाल्या. झालं गेलं गंगेला मिळालं.
******************************************
15 जून 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची
सुरुवात होऊनही शाळा बंद..! आता या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय ? पुन्हा तोच
प्रश्न ऐरणीवर आला..! आता मात्र पर्याय शोधण्याची वेळ आली. शासनानेही सूचित केले
आहे की, ऑनलाइन/ऑफलाइन शिक्षण सुरू करा. शासनाने सुद्धा त्या दिशेने पावले उचललेली
आहेत.टी.व्ही /रेडिओच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
तत्राप ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागातील काही पालकांकडे टी.व्ही, रेडिओ,
संगणक, स्मार्ट मोबाईल यासारख्या सुविधा नाहीत.शिवाय विद्यार्थ्यांच्या स्क्रीन
टाईम मुळे विद्यार्थ्यांच्या कान-डोळ्यासह एकंदरीत आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मुलांच्या हाती मोबाईल आल्यावर अभ्यास करतील असे ठामपणे सांगता येणार नाही. या
सर्व समस्या रास्त आहेत आणि त्या सर्वमान्य आहे. मग विद्यार्थ्यांचा अभ्यास
घ्यायचाच नाही का? जर असे केले नाही तर
चुकीचे होईल. किमान साध्या मोबाईलचा तरी वापर करून विद्यार्थ्यांमधील ज्ञान प्रवास
सुरू ठेवणे आवश्यक राहील. महत्त्वाचे म्हणजे डिजिटल इंडियाच्या निर्मितीसाठी
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिकवणे, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करता येणे हा
सुद्धा शिक्षणाचा एक भागच आहे. विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन कसे करावे एवढी तरी
माहिती फोनवरून दिली तरी निश्चित फायद्याचे ठरेल. ऑनलाईन शिक्षण हे पुरक साधन
आहे.या साधनाचा मर्यादित वापर करणे हा एक पर्याय म्हणून सध्या त्याकडे बघितले
पाहिजे.
************************************************
सध्या शिक्षण प्रक्रियेत यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पालक. पालकांनी
सहकार्य केलं तर मुलांची शिक्षण प्रक्रिया सुरू राहू शकते. शिवाय या शिक्षण
पद्धतीचा वापर काही दिवसांकरिता म्हणजे मर्यादित कालावधीसाठी आहे. कोरोनाचा
प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एकदाच्या नियमितपणे शाळा सुरू झाल्या की ऑनलाईन शिक्षण
पद्धती बंद होईल. विद्यार्थ्यांच्या विकासाचे ज्ञानमंदिर खरे तर शाळाच आहे. पण
आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि काही कालावधीकरिता ऑनलाइन/ऑफलाईन
पद्धतीचा वापर गरजेचा आहे.1ली व 2 री च्या वर्गासाठी ऑनलाईन शिक्षण नकोच.
शिक्षकांनी पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांकडून नेमक्या Activity कशा
करून घ्याव्यात याची माहिती शिक्षक देऊ शकतील.त्यांच्याकरवी अभ्यास कसा पूर्ण करून
घेता येईल याचेही मार्गदर्शन करता येईल. 3
री ते 7 वी पर्यंत ऑफलाईन म्हणजे Pdf च्या
माध्यमातून अभ्यास देता येईल. Pdf एकदा download केली तर पुन्हा पुन्हा डेटा वापरण्याची
गरज येणार नाही. विद्यार्थी मोबाईलच्या
माध्यमातून WhatsApp द्वारा दिलेला
अभ्यास पूर्ण करू शकतील. 8 वी पासून ऑनलाईन शिक्षणपद्धती वापरण्यास हरकत
नसावी असे वाटते.
थोडक्यात या पद्धतींचा वापर करताना
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा, त्यांच्याकडे असलेल्या साधन सुविधांचा योग्य विचार
करणे आवश्यक ठरेल.
No comments:
Post a Comment