Sunday, April 26, 2020

ओझरखेड शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पोहोचणार मंगळावर....!

         'नासा' या अवकाश संशोधन संस्थेचे "मंगळ सोव्हर 2020" हे अंतरिक्षयान मंगळ ग्रहावर जुलै 2020 मध्ये झेपावणार आहे. या यानातील स्टेनसिल्ड चिपवर आपली नावे पाठवून, मानवी इतिहासातील परग्रहावर नावाच्या रूपात आपल्या पाउलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिलेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत ओझरखेड शाळेतील शिक्षक विश्वास पाटोळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नावे  https://mars. nasa.gov/participate/send your name/mars2020  या वेबसाईटवर नोंदवले होते. विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे. चालू घडामोडी व शालेय शिक्षण यांचा समन्वय साधण्यासाठी सजग असणे हा या नाव नोंदणीचा मुख्य हेतू होता.  सदर नोंदणीचे बोर्डिग पास उपलब्ध झाले असून आज शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते बोर्डिंग पासचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाच्या हाती पास आल्यावर चिमुकल्यांनी एकाचवेळी आश्चर्य व आनंद व्यक्त केला.
                 "मंगळ रोव्हर 2020" हे यान Atlas V-541 या राॅकेटच्या मदतीने अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 पर्यंत लाॅन्च केले जाणार आहे, जे 2021 च्या फेब्रुवारीत मंगळावर पोहचेल. मंगळ मोहिमेअंतर्गत जगभरातील सुमारे दहा लाख नावे इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर यानाच्या माध्यमातून पोहचवली जाणार आहेत.
            मानवी केसांच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( 75 नॅनोमीटर ) रूंदीत  नोंदवलेली ही नावे स्टेन्सिल करून एक डेमी इतक्या आकाराची ही चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवली जाणार आहे आणि जगासोबत या मोहिमेचे साक्षीदार असतील ओझरखेड शाळेतील चिमुकले.


 📝 विश्वास पाटोळे
       शाळा-ओझरखेड
       ता.दिंडोरी,जि नाशिक 

No comments:

Post a Comment