Thursday, July 9, 2020

ऑनलाईन शिक्षणपध्दती....

ऑनलाईन शिक्षणपद्धती...

                                                                    दिनांक -16-06-2020

चिंता ...विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

भय ....संसर्गजन्य कोरोनाचे, आणि

अनेक अडचणी...ऑनलाईन शिक्षण पद्धतीत.

दिसतोय या सर्वांचा एकच परिणाम

होतेय सर्वांची फक्त घुसमट. 

कोणताच पर्याय सर्वमान्य नाही..........


              सद्यस्थितीत शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही जुलमी कोरोना ने शिरकाव केला आहे. अशा भयावह परिस्थिती शाळा भरवली जाणार नाही हे सत्य आहे. आरोग्याच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तरी संपर्कातून होणाऱ्या या संसर्गजन्य आजारापासून रक्षण करण्याची जबाबदारी कोणीही घेऊ शकत नाही.

यापार्श्वभूमीनुसार अजून काही दिवस तरी शाळा सुरू होण्याचे चिन्ह दिसत नाही.मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे कसे होणार? हा प्रश्न सर्वांसमोर समस्या म्हणून निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन महिन्यांपासून ( मे महिन्याची सुट्टी वगळता) विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून, शैक्षणिक वातावरणापासून दूर आहे हा चिंतेचा विषय आहे. अशावेळी विद्यार्थ्यांमध्ये पठारावस्था येण्याची शक्यता आहे. त्यांच्या मानसिकतेत बदल होऊ शकतो. शिवाय पालक व विद्यार्थ्यांना याचीही जाणीव आहे की आरटीई कायद्यानुसार विद्यार्थी पास झाला नाही तरी आणि शाळेत गेला नाही तरी त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. म्हणून पालक ही बिनधास्त आणि विद्यार्थी ही स्वच्छंदी आणि मुक्तपणे वावरत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात यामुळे बाधा निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाईन शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय तरी कोणाकडे उपलब्ध नाही.

              हे मात्र नक्की आहे की ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबत तेही जिल्हा परिषदांच्या शाळा  संदर्भात शहरीभाग, ग्रामीणभाग व अतिदुर्गमभाग या वर्गीकरणानुसार विचार केला तर पहिले दोन्ही भाग वगळता तिसऱ्या भागात म्हणजेच अतिदुर्गम भागाच्या गावातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. जीवन जगण्यासाठी मोल-मजूरीतून चरितार्थ चालवणे हाच काय नित्यक्रम. अशा सर्वच पालकांकडे स्मार्टफोन नाही शिवाय संबंधित गावात नेटवर्क सुस्थितीत नाही. साधा व्हॉइस कॉल करण्यासाठी टेकड्यांचा आधार घ्यावा लागतो. अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पद्धती राबवणे शक्य नाही. शासनच फक्त यावर उपाययोजना करू शकते.

             पण यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवू नये असा विचार केला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. 15 जून रोजी मा. मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी शैक्षणिक कामकाज सुरू करण्याबाबत वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकानुसार ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये शाळा सुरू करण्याबाबत सूचित केले आहे. पण तोपर्यंत निम्मे शैक्षणिक वर्ष संपलेले असेल.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण देणे आवश्यक आहे.

          शहरी व ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देणे शक्य होईल पण अतिदुर्गम भागात शक्य होणार नाही. तेथे ऑफलाईन शिक्षण म्हणजेच साध्या मोबाईलद्वारे पालकांशी तसेच विद्यार्थ्यांची संपर्क करून अभ्यास देणे शक्य होईल पण या ऑनलाईन/ऑफलाइन शिक्षण पद्धतीमुळे नक्कीच सर्वत्र समानता येणार नाही. अडचणी येतील पण हे ही नसे थोडके.... असे समजून या सर्व अडचणींवर आमचे शिक्षक नक्कीच मात करण्याचा प्रयत्न करतील. त्या संदर्भात मात्र विरोधासाठी विरोध करू नये असे वाटते.

 ****************************************

                मागील मार्च-एप्रिल महिन्यात मुलांच्या काळजीपोटी प्रशासन, शिक्षक व पालक यांनी Learning From Home च्या माध्यमातून ज्ञान प्रवाह सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला होता. यात विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा हे मुळीच अपेक्षित नव्हते. मुलांनी घरातच सुरक्षित राहावे. LOCKDOWN च्या काळात घरी बसून कंटाळवाणे वाटू नये म्हणून थोडासा अभ्यास करावा ही माफक अपेक्षा होती. तरी मात्र या ऑनलाईन अभ्यासावर मात्र प्रचंड टीका झाली. ही टीका होत असताना काही टीकाकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या बाजूने उभे राहिले, काही टीकाकार अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले तर काही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाच्या बाजूने उभे राहिले. वरिष्ठांकडे तक्रारी गेल्या.मग फतवा निघाला की, प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणतेही ऑनलाईन अभ्यास अथवा कोर्स सुरू करू नये. या कळीच्या मुद्यावर साधक-बाधक चर्चा करत-करत मार्च व एप्रिल महिना संपला. 1 मे पासून विद्यार्थ्यांना अधिकृत सुट्टी लागल्यामुळे चर्चा/ टीका बंद झाल्या. झालं गेलं गंगेला मिळालं.

 ******************************************

              15 जून 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होऊनही शाळा बंद..! आता या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय ? पुन्हा तोच प्रश्न ऐरणीवर आला..! आता मात्र पर्याय शोधण्याची वेळ आली. शासनानेही सूचित केले आहे की, ऑनलाइन/ऑफलाइन शिक्षण सुरू करा. शासनाने सुद्धा त्या दिशेने पावले उचललेली आहेत.टी.व्ही /रेडिओच्या माध्यमातून शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

            तत्राप ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागातील काही पालकांकडे टी.व्ही, रेडिओ, संगणक, स्मार्ट मोबाईल यासारख्या सुविधा नाहीत.शिवाय विद्यार्थ्यांच्या स्क्रीन टाईम मुळे विद्यार्थ्यांच्या कान-डोळ्यासह एकंदरीत आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांच्या हाती मोबाईल आल्यावर अभ्यास करतील असे ठामपणे सांगता येणार नाही. या सर्व समस्या रास्त आहेत आणि त्या सर्वमान्य आहे. मग विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचाच नाही का?  जर असे केले नाही तर चुकीचे होईल. किमान साध्या मोबाईलचा तरी वापर करून विद्यार्थ्यांमधील ज्ञान प्रवास सुरू ठेवणे आवश्यक राहील. महत्त्वाचे म्हणजे डिजिटल इंडियाच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिकवणे, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करता येणे हा सुद्धा शिक्षणाचा एक भागच आहे. विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन कसे करावे एवढी तरी माहिती फोनवरून दिली तरी निश्चित फायद्याचे ठरेल. ऑनलाईन शिक्षण हे पुरक साधन आहे.या साधनाचा मर्यादित वापर करणे हा एक पर्याय म्हणून सध्या त्याकडे बघितले पाहिजे.   

 ************************************************

            सध्या शिक्षण प्रक्रियेत यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पालक. पालकांनी सहकार्य केलं तर मुलांची शिक्षण प्रक्रिया सुरू राहू शकते. शिवाय या शिक्षण पद्धतीचा वापर काही दिवसांकरिता म्हणजे मर्यादित कालावधीसाठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर एकदाच्या नियमितपणे शाळा सुरू झाल्या की ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद होईल. विद्यार्थ्यांच्या विकासाचे ज्ञानमंदिर खरे तर शाळाच आहे. पण आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि काही कालावधीकरिता ऑनलाइन/ऑफलाईन पद्धतीचा वापर गरजेचा आहे.1ली व 2 री च्या वर्गासाठी ऑनलाईन शिक्षण नकोच. शिक्षकांनी पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांकडून नेमक्या Activity  कशा करून घ्याव्यात याची माहिती शिक्षक देऊ शकतील.त्यांच्याकरवी अभ्यास कसा पूर्ण करून घेता येईल याचेही मार्गदर्शन करता येईल.  3 री ते 7 वी पर्यंत ऑफलाईन म्हणजे Pdf च्या माध्यमातून अभ्यास देता येईल. Pdf एकदा download केली तर पुन्हा पुन्हा डेटा वापरण्याची गरज  येणार नाही. विद्यार्थी मोबाईलच्या माध्यमातून WhatsApp द्वारा दिलेला अभ्यास पूर्ण करू शकतील. 8 वी पासून ऑनलाईन शिक्षणपद्धती वापरण्यास हरकत नसावी असे वाटते.

 थोडक्यात या पद्धतींचा वापर करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा, त्यांच्याकडे असलेल्या साधन सुविधांचा योग्य विचार करणे आवश्यक ठरेल.


Tuesday, May 19, 2020

दीदींचा वाढदिवस


ऐ मेरे वतन के लोगोजरा आखं मे भरलो पानीजो शहीद हुए है उनकीजरा याद करो कुर्बानी.....

        गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेले हे देशभक्तीपर गीत आजही हृदयाला स्पर्श करून जाते. गाणे ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात. डोळ्यासमोर साक्षात रणभूमीत शत्रूचा फडशा पाडून, त्यांचे तळ नेस्तनाबूत केल्यानंतर त्या ठिकाणी तिरंगा रोवून सलामी देणारे वीर जवान दिसतात. शेवटची घटका जवळ येऊनसुध्दा वीर जवान हसत हसत या भारत भूमीला वंदन करताना दिसतात. रणभूमीवर रक्ताचे पाट वाहत असूनसुध्दा विजयाचा आनंद साजरा करताना दिसतात .अशा या निधड्या छातीच्या जवानांची आहुती, त्यांचे शौर्य, धैर्य,त्याग, बलिदान याचा भारतीयांना विसर पडू नये असा अनमोल संदेश या गीतातून व्यक्त होत आहे.               

       प्रत्येक भारतीयांच्या रोमारोमात, नसानसात हे गाणे कोरले आहे हे सूर्याइतके सत्य आहे. शिवाय लतादीदींचे शेकडो गाणे काळजाचा ठाव घेणारी आहेत. पैकी हे गाणे माझे खूपच आवडीचे आहे कारण या गीतात भारतीय वीर जवानांची शौर्यगाथा वर्णन करून  राष्ट्रभक्तीचा संदेश संपूर्ण भारतीयांना दिलेला आहे. शिवाय या गाण्याचे शब्द खूप मार्मिक असल्याने ऐकणारा तात्काळ भावुक होतोच.कवी प्रदीप यांची प्रभावी शब्दरचना, सी.रामचंद्र यांचे समर्पक संगीत आणि लतादीदींचा अद्वितीय स्वर ....अशा त्रिवेणी संगमामुळे या गाण्याने इतिहास घडवला.

            मला आजही चांगलं आठवतं माध्यमिक शिक्षण घेत असताना आम्ही दोन वर्ष एनसीसी(भारतीय छात्र सेना) मध्ये सहभागी होतो. सन 1987- 88 मध्ये एच.ए.एल.ओझर, नाशिक येथे दहा दिवसांसाठी एनसीसी चा कॅम्प गेला होता. त्यावेळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एच.ए.एल.कॉलेजमधील एका मुलीने हे गीत गायले होते. हे गीत ऐकून खूपच प्रभावित झालो. एकता और अनुशासन हे घोषवाक्य असलेल्या एनसीसी मुळे  राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ही मूल्ये रूजू लागली यामुळेच हे गाणे खूप भावले.

             खरे तर, हे गीत ऐकले तेव्हा कोणी गायले,का गायले वगैरे बाबत काहीच कळत नव्हते त्यावयात. पण हळुहळु वय वाढत असताना विचाराच्या कक्षाही रुंदावल्या. त्यानुसार या गाण्याचा खोलवर असा अर्थ उमजत गेला. गाणे कळायला लागले. गायक माहित व्हायला लागलेत. गायकांच्या आवाजातील माधुर्य समजायला लागले. तेव्हा कुठे या गाण्याची पूर्ण माहिती मिळाली.

            देशभक्तीपर आधारित हे गीत कवी प्रदीप यांनी इ.स.1963 साली भारत-चीन युद्धानंतर या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिले.

          कवी प्रदीप यांना रामलीला मैदानावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमत्त भारतीय फिल्म उद्योगातर्फे आयोजित संगीत संध्येच्या उद्घाटनासाठी एक गीत लिहावे अशी विनंती निर्माते मेहबूब खान यांनी केली होती. हे गाणे प्रदीप यांना जेव्हा  सूचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथेच पडलेल्या एका रिकाम्या सिगारेटच्या पाठको-या भागावर त्यांनी हे गाणे लिहिले.

       27 जानेवारी 1963 रोजी सर्वप्रथम रामलीला मैदानावर लतादीदींनी हे गीत गायले. या कार्यक्रमाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन व सर्व केंद्रीय मंत्री हजर होते. शिवाय चित्रपट सृष्टीतील दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, राज कपूर, देव आनंद व गायक मोहम्मद रफी हे उपस्थित होते. लतादीदींच्या सुमधुर कंठातून भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहणारे हे गीत ऐकून जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होतेच पण अनेक श्रोते अक्षरशः रडत होते.

         अगदी आज सुद्धा हे गीत ऐकल्यानंतर तमाम भारतीयांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहात नाहीत. करिता गानसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लतादीदींना सलाम.
आणि दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....!

श्री.विश्वास पाटोळे
पंचवटी, नाशिक

Thursday, April 30, 2020

मास्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक

 कोरोना जागृती....
मास्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक...

संपूर्ण जगाची झोप उडविणारा... काय आणि कसा आहे कोरोना वायरस?  कोरोना वायरस बाधित व्यक्तीचे लक्षणे, त्या अनुषंगाने करावयाचे प्रतिबंधक उपाय व प्रत्येकाने घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. कोणत्याही प्रकारचा गैरसमज न करून घेता अथवा घाबरून न जाता वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणिवपूर्वक नमूद केले आणि विद्यार्थ्यांनीही ते जिज्ञासूवृत्तीने समजून घेतले.

शेवटी प्रात्यक्षिक व प्रयोग म्हणून... आम्ही टिशू पेपर पासून मास्क तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो Successful झाला.सदर मास्क चेह-यावर अडकून मुलं एकमेकांना विचारत होती...कसा दिसतो?

आज नवीन आणि उपयुक्त वस्तू तयार केल्याचा आनंद लेकरांना झाला...आणि हेच आपले समाधान....



शाळा-ओझरखेड
ता. दिंडोरी

अचानक भरवलेली गणित कार्यशाळा...

अचानक भरवलेली गणित कार्यशाळा...

          नाशिक जिल्ह्याचे गणित मित्र आदरणीय वाल्मिक चव्हाण सर आज अचानक ओझरखेड शाळेत आले. सरांना बघून आश्चर्याचा धक्काच बसला. काही बोलण्याच्या आत चव्हाण सर म्हणाले, "सकाळी तुमच्या शाळेची बातमी वाचलेली होती. सुरगाणा येथे सुरु असलेल्या निष्ठा प्रशिक्षणास जात असताना मनात विचार आला की, आपले सर्वांचे अभिनंदन करावे म्हणून आलो. खरे तर या शाळेत गणित चळवळ सुरू करण्यासाठी मला यायचं होतं. आज योगायोगाने येथे येण्याचा योग जुळून आला." आम्हालाही आनंद झाला कारण चव्हाण सरांना मी याआधी शाळेत येण्यासाठी विनंती केली होती. सरांना दोन मिनिटांसाठी ऑफिसात बसण्यास सांगितले पण सरांनी तिथे बसण्यापेक्षा वर्गात जाऊ असे सूचविले.त्यांचा उत्साह पाहून मी विनंती केली की, एकाच वर्गात जाण्यापेक्षा सर्वांना मैदानात बोलावू का? त्यांचा होकार येताच काही  मिनिटातच मैदानात आसनव्यवस्था केली. आणि सुरू झाली चिमुकल्यांची गणित कार्यशाळा.....

           मण्यांची माळ सामोरे ठेवून ज्ञानरचनावाद पद्धतीने पुर्वानुभवांची सांगड प्रात्यक्षिकांची जोडून एकक, दशक पासून ते पाच अंकी संख्या गणनपर्यंत ज्ञानाची निर्मिती किती सहजतेने करून घेतली हे अर्ध्या तासात विद्यार्थ्यांना ही कळले नाही. या अध्ययन-अनुभूतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मिळवला.
विशेष...

         यावेळी विचारलेल्या प्रश्नांची जास्त वेळा अचूक उत्तर देणारी इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी गुंजन हिला गणित मित्र म्हणून घोषित करून तिचे अभिनंदन केले. स्वत:चा 'गणित मित्र' बॅज सरांकडून तिला देण्यात आला.यामुळे चिमुकली खूपच भारावली.

         यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसमवेत तीनच्या पाढ्यावर आधारित एक आनंददायी मोकळीका सादर केली, ज्यामुळे विद्यार्थी खूप आनंदी झालेत. अवघड वाटणारा गणित विषय सोपा असल्याचा अनुभव यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.

    या शाळेत गणित चळवळ उभारण्याचा मानस चव्हाण सरांनी व्यक्त केला ज्यास विद्यार्थ्यांनी होकार देऊन पुन्हा येण्याचा आग्रह धरत सरांचा होकार मिळवला.

         आमच्या शाळेतील चिमुकल्यांसाठी सरांनी दिलेली भेट निश्चित प्रेरणादायी ठरली आहे. करिता चव्हाण सरांचे मनःपूर्वक आभार.




विश्वास पाटोळे
शाळा- ओझरखेड

शाब्बास गुरुजी...!







प्रेरणादायी सन्मान......!

प्रेरणादायी सन्मान......!


       
         दिंडोरी : (17 फेब्रुवारी) मडकीजांब येथे आयोजित दिंडोरी तालुकास्तरीय शिक्षण परिषदेत आमच्या जिल्हा परिषद ओझरखेड शाळेला सन-2019-20 या वर्षांतील शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री. बी. डी. कनोज साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. एस. पी.पगार साहेब, सौ.एस.एस.घोलप मॅडम व केंद्रप्रमुख पवार सर व्यासपीठावर उपस्थित होते.

          उपक्रमशील शाळेचे सन्मानपत्र स्विकारताना ओझरखेड शाळेचे मुख्याध्यापक श्री. पोपट भोये, पदवीधर शिक्षक श्री. विश्वास पाटोळे, श्री. प्रकाश भोये, उपशिक्षक श्री. तुकाराम राऊत, श्रीम.नलिनी बागूल, श्रीम.मनिषा वलंगे आदी......


ओझरखेड शाळेचा राज्यस्तरावर गुणगौरव....

Feeling good...!

 ओझरखेड शाळेचा राज्यस्तरावर गुणगौरव....

    पुणे येथील स्कायसायक्यू , रोटरी क्लब, वनराई, पराडकर फाऊंडेशन, स्वच्छ भारत, Gyan-Key, IISER , Big FM 95 यांच्या सहकार्याने दि. 14 व 15 फेब्रुवारी रोजी ....IISER पुणे कॅम्पस मध्ये  राज्यस्तरीय "घनकचरा व्यवस्थापन स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती.
        2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून 20000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. त्यात उत्कृष्ट अशा 150 विद्यार्थ्यांना निमंत्रित केले होते. सदर 150 विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरखेड ता.दिडोरी येथील इ.6 वी ची विद्यार्थीनी कु.किर्ती भारत ठाकरे  व वर्ग शिक्षक म्हणून माझी निवड झाली होती.
    या स्पर्धेत आम्ही घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत...टाकाऊ प्लास्टिक कच-यापासून तयार केलेला वाचन कट्टा व स्टूलच्या प्रतिकृतीचे सादरीकरण केले.

          या स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्पर्धकांना
मा.रविंद्र धारीया..अध्यक्ष,वनराई
मा.प्रदीप लोखंडे...अध्यक्ष, Gyan-Key
मा.सानिका मॅम... RJ , Big FM 95
मा.जयप्रकाश पराडकर..पराडकर फाऊंडेशन,पुणे
मा.संगीता खडाळकर...रोटरी क्लब, पुणे
मा.ज्ञानेश्वर मोळककर -अतिरिक्त आयुक्त, पुणे
मा.दिप्ती व मोहन पुजारी..स्कॉयसायक्यू  फाऊंडेशन,पुणे
मा.अरूण कुदळे ..माजी प्रांतपाल, पुणे रोटरी क्लब.
मा.जिनेंद्र मुनोद... पुणे सेंट्रल रोटरी क्लब
यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी स्कायसायक्यूच्या अध्यक्षा मा.दिप्ती पुजारी यांनी आमच्या गौरवाप्रसंगी ओझरखेड शाळेतील विद्यार्थ्यांचे व  शिक्षकांचे विशेष कौतुक करून अधोरेखित केले की, यांनी हा उपक्रम  केवळ त्यांच्या शाळेतच राबविला नाही तर संपूर्ण गाव प्लास्टिक कचरामुक्त करण्यासाठी झटत आहेत आणि खूपच गौरवास्पद कार्य आहे.

  या दोन दिवशीय स्पर्धा काळात विविध मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी मोठी संधी मिळाली. तसेच या संस्थाशी आमची शाळा जोडली गेल्यामुळे विशेष आनंद होत आहे.
  वरील सर्व संस्थांचे मनःपूर्वक आभार..!








ओझरखेडला लेकीच्या सन्मानार्थ घरावर नावाची पाटी....

ओझरखेडला लेकीच्या सन्मानार्थ घरावर नावाची पाटी....

 दिंडोरी, ता.3:  जिल्हा परिषद ओझरखेड शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिनानिमित्त "करूया सन्मान लेकीचा" या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
           प्रारंभी ढोल-ताशांच्या गजरात गावातून मुलींच्या सन्मानार्थ फेरी काढण्यात आली. फेरी दरम्यान 'लेक वाचवा, लेक शिकवा', 'मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण', 'शिकलेली आई, घर पुढे नेई', अशा घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून निघाला.
        रोजच सुंदर दिसणारी लेक आज सावित्री होऊन दारी अवतरली ती स्वतःच्या नावाची पाटी घेऊन. यावेळी पालकांनी लेकीचे औक्षण केले. त्यांच्या नावाची पाटी दारावर लावून आनंदोत्सव साजरा केला.आजच्या आश्चर्यकारक व सुखद अनुभूतीने आईंचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले.
       यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषदच्या विद्यमाने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
       सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पोपट भोये व पदवीधर शिक्षक विश्वास पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले.





निसर्गाशी मैत्री

निसर्गाशी मैत्री....

              माझ्या वर्गात "स्वच्छ शाळा, सुंदर शाळा" उपक्रम अंतर्गत स्वच्छता समिती तयार केली आहे. दररोज गटनिहाय विद्यार्थी वर्गाची स्वच्छता करतात. शाळेत येतांना त्या दिवशी वाराप्रमाणे निश्चित केलेली फुले वर्गात घेऊन येतात.
            आज पावसामुळे मुलांना फुले आणणे शक्य झाले नाही. पण आमच्या वर्गासमोर जास्वंदचे झाड आहे. परिपाठ सुरू होण्यापूर्वी त्या झाडाभोवती मुलं गोळा झालेली दिसली. जवळ गेल्यावर समजले आज त्या झाडावर टपोरी तितकीच देखणी फुले उमललेली होती. मुलं त्या फुलांना अंजारत होती...गोंजारत होती.
मी विचारले...काय करताएत तुम्ही?
मुलं उत्तरली...सर, आज जास्वंद चे फुले आणायची होती. पण गावात मिळाली नाहीत.
मग आता ?...मी विचारले.
मुलं दबक्या आवाजात बोलली.... "सर, हे फुले तोडूशे वाटत नाही, वर्गात नेण्यापेक्षा येथेच छान दिसून राहिले."
काही क्षणाचा विलंब न करता मी बोललो....Yes, you are right !.

मुलांनीही क्षणात टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.



✍विश्वास पाटोळे
ओझरखेड ता.दिंडोरी

सीग्राम कंपनी मार्फत ओझरखेड शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन...

सीग्राम कंपनी मार्फत ओझरखेड शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन...

               शालेय ज्ञानाबरोबरच विविध स्पर्धांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना विकास व्हावा या उद्देशाने दिंडोरी तालुक्यातील सीग्राम कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत ओझरखेडच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

         पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नृत्य- गायन, लिंबू-चमचा व संगीत खूर्ची तर पाचवी ते सातवीसाठी वक्तृत्व, चित्रकला व सुंदर हस्ताक्षर अशा सहा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम ते तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना येत्या 15 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरीत केले जाणार आहेत.

          या स्पर्धांचे आयोजन कंपनीच्या सीएसआर विभागातील कार्यकारी अभिषेक वाघमवार, कचरू आहिरे, प्रशांत मोरे, सोमेश्वर गांगुर्डे व सागर नाठे यांनी केले. स्पर्धांचे परीक्षक म्हणून शाळेतील शिक्षक प्रकाश भोये, तुकाराम राऊत, नलिनी बागूल व मनिषा वलंगे यांनी काम पाहिले. स्पर्धा समाप्ती नंतर सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट व खाऊ चे वाटप कंपनीमार्फत करण्यात आले त्यामुळे बच्चे कंपनी अधिक खूष झाली....












श्री.विश्वास पाटोळे
शाळा - ओझरखेड

ओझरखेड शाळेत मुलांच्या हातात अवतरली अभासी सुर्यमाला

ओझरखेड शाळेत मुलांच्या हातात अवतरली अभासी सुर्यमाला....


     भूगोल विषयातील नेहमीच कुतूहल निर्माण करणारा घटक म्हणजे अवकाशातील आपली सूर्यमाला. सूर्याभोवती फिरणारे नऊ ग्रह व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, ग्रहांची परिवलन व परिभ्रमणाची कक्षा, त्यांचे सातत्य, त्यांचे वैशिष्ट्ये यासारख्या बाबींची माहिती समजून घेणे हा विद्यार्थ्यांसह सर्वांचा आवडीचा विषय आहे. म्हणून आज शाळेत मोबाईलमधील ॲप्लिकेशन Galactic Explorer for merge cube व QR कोड असलेल्या क्यूबच्या सहाय्याने 3D इफेक्ट सह सूर्यमाला प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
या प्रात्यक्षिक मध्ये सूरवातीला एका विद्यार्थीनीच्या हातावर merge cube ठेवल्यानंतर मोबाईलमधील ॲप्लिकेशनच्या सहाय्याने cube scan केल्यावर मोबाईलमध्ये cube च्या जागी म्हणजेच विद्यार्थ्यीनीच्या हातावर सूर्यमाला अवतरल्याचे दिसू लागले.सर्व मुलांनी मोबाईलमधील सूर्यमालाचे live प्रात्यक्षिक बघितले आणि सर्व आश्चर्यचकित झाले पण ज्या मुलीच्या हातावर cube होता तिला मात्र हातावर सूर्यमाला दिसली नाही.कारण ती फक्त त्या cube कडे पहात होती.पण जेव्हा तिला या प्रात्यक्षिकाचे recording व Screen shot दाखवले तेव्हा मात्र ती बुचकळ्यात पडली व आनंदाने हसू लागली.असे आश्चर्यकारक अनुभव विद्यार्थ्यांना देता-देता सूर्यमालिकेतील ग्रहांची सविस्तर माहिती देण्यात आली.

                  


या प्रात्यक्षिकमुळे सर्वांना सूर्यमाला जवळून बघता आली नव्हे तर प्रत्यक्ष  हाताळता आली. प्रत्येक ग्रहाचे सूक्ष्म निरीक्षण करता आले.

✍विश्वास पाटोळे.
   शाळा-ओझरखेड.

Sunday, April 26, 2020

ओझरखेड शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पोहोचणार मंगळावर....!

         'नासा' या अवकाश संशोधन संस्थेचे "मंगळ सोव्हर 2020" हे अंतरिक्षयान मंगळ ग्रहावर जुलै 2020 मध्ये झेपावणार आहे. या यानातील स्टेनसिल्ड चिपवर आपली नावे पाठवून, मानवी इतिहासातील परग्रहावर नावाच्या रूपात आपल्या पाउलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिलेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत ओझरखेड शाळेतील शिक्षक विश्वास पाटोळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची नावे  https://mars. nasa.gov/participate/send your name/mars2020  या वेबसाईटवर नोंदवले होते. विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता निर्माण करणे. चालू घडामोडी व शालेय शिक्षण यांचा समन्वय साधण्यासाठी सजग असणे हा या नाव नोंदणीचा मुख्य हेतू होता.  सदर नोंदणीचे बोर्डिग पास उपलब्ध झाले असून आज शाळा व्यवस्थापन समितीच्या हस्ते बोर्डिंग पासचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाच्या हाती पास आल्यावर चिमुकल्यांनी एकाचवेळी आश्चर्य व आनंद व्यक्त केला.
                 "मंगळ रोव्हर 2020" हे यान Atlas V-541 या राॅकेटच्या मदतीने अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 पर्यंत लाॅन्च केले जाणार आहे, जे 2021 च्या फेब्रुवारीत मंगळावर पोहचेल. मंगळ मोहिमेअंतर्गत जगभरातील सुमारे दहा लाख नावे इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर यानाच्या माध्यमातून पोहचवली जाणार आहेत.
            मानवी केसांच्या एक हजाराव्या भागाइतक्या ( 75 नॅनोमीटर ) रूंदीत  नोंदवलेली ही नावे स्टेन्सिल करून एक डेमी इतक्या आकाराची ही चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवली जाणार आहे आणि जगासोबत या मोहिमेचे साक्षीदार असतील ओझरखेड शाळेतील चिमुकले.


 📝 विश्वास पाटोळे
       शाळा-ओझरखेड
       ता.दिंडोरी,जि नाशिक 
सायकल म्हणते, मी आहे ना...!

                पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठी सायकल चालवणे सध्या या धावपळीच्या जीवनात गरजेचे बनले आहे. म्हणूनच आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंगचे महत्त्व खूप वाढलेले आहे. लहान्यांपासून वृद्धही सायकल चालवू लागले आहेत. विशेष असे की अशा सायकलवरून जगाची सफर करणारे अनेक विक्रमादित्य होऊन गेले आहेत. विविध खडतर भागातील जागतिक सायकल स्पर्धा जिंकून अनेक मान्यवरांनी सायकलिंगचे विक्रम त्यांच्या नावावर केले आहेत. आणि हे नक्कीच कौतुकास्पद व गौरवशाली आहे.
        सध्या तर स्मार्ट सीटीने सार्वजनिक ठिकाणी भाडेतत्वावर सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. व्यायामाचे महत्त्व समजलेल्या व्यक्ती या सायकली चालून व्यायामाचा आनंद घेत आहेत.
    अशा या कमी खर्चिक व हितकारक  वाहनाचे आत्मकथन जाणून घेताना आमचे विद्यार्थी खूष....

जि.प.प्राथ.शाळा-ओझरखेड, ता. दिंडोरी
वर्ग- 6 वी
विषय-मराठी
उपघटक-सायकल म्हणते,मी आहे ना !

अध्यापन पद्धत - ज्ञानरचनावाद

1) पुर्वज्ञान - ब-याच मुलांच्या घरी सायकल आहे.सायकल खेळ म्हणून चालवतात. सायकल शिकताना आलेल्या गमतीशीर अनुभवांचे कथन.पहिल्या सायकल खरेदीचा आनंद... या सा-या अनुभवावर चर्चा.
2) पुर्वानुभवांशी ज्ञानाची सांगड - मुले कुटुंबियांच्या मदतीसाठी छोटी-मोठी कामे करण्यासाठी सायकलचा वापर करतात.
उदा. दुकानातून वस्तू विकत घेऊन येणे. भाजीपाला आणणे. दुध आणणे. मेडिकल वरून औषध-गोळ्या आणणे इ.
3) ज्ञानाची निर्मिती - सायकल चालवण्याचे फायदे ...

अ) वैयक्तिक फायदे -
1) माफक किंमतीत सायकल मिळते.
2) सायकल चालवण्याने व्यायाम होतो.  प्रतिकार शक्ती वाढते. वेगळा व्यायाम करण्याची आवश्यकता नाही.
3) शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.4) मेन्टेनन्स् खर्च अत्यल्प.
5) सायकलीत बिघाड झाला तर हलकी-फुलकी असल्याने ने-आण करणे सोपे होते.
6) पार्किगसाठी जागा कमी लागते.

ब) सामाजिक फायदे -
1) अपघाताचे प्रमाण कमी असते.
2) गर्दीतही सायकल रेटून नेता येते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवत नाही.
3) महत्त्वाचे म्हणजे वायू प्रदुषण होत नाही.

क) राष्ट्रीय फायदे -
1) पेट्रोल व डिझेल या इंधनांची बचत होते.परिणामी देशाचे चलन वाचते.
2) परदेशातून जास्त प्रमाणात इंधन विकत घ्यावे लागत नाही.
स्वाध्यायः-
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


         आज वर्गात प्रत्यक्ष सायकल आणल्यावर विद्यार्थ्यांना पाठाचा अंदाज आला. पण विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करताना सायकलच्या भागांची नावे विचारले. तेव्हा एक-एक विद्यार्थ्यांने जे काही नावे सांगितले ते ऐकूण सर्व वर्ग हसून हसून थकला.हिच आजच्या दिवसाची  वैशिष्ट्येपूर्ण बाब ठरली...!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

📝 विश्वास पाटोळे
      शाळा-ओझरखेड
ओझरखेड शाळेतील विद्यार्थी होणार  संगणक साक्षर.....

            दिंडोरी तालुक्यात ओझरखेड शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांचेकडून राबविण्यात येत असलेला 'एक हात मदतीचा'... या उपक्रमात नाशिक येथील SAN COMPUTEK चे CEO मा.संजय चावला यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहभाग नोंदवला.त्यांनी विद्यार्थ्यांच्या संगणक साक्षरतासाठी एक अद्ययावत संगणक संच सॅन चे सिनि.इंजिनिअर राहूल साळुंखे यांच्या हस्ते सुपूर्द केला.यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक शिक्षणाची समस्या सोडवली गेल्याने विद्यार्थ्यांना चेह-यावर आनंद झळकला.
          या प्रसंगी गावचे सरपंच गंगाधर निखाडे, तंटामुक्त गावचे अध्यक्ष भास्कर निखाडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा शिरसाठ, शिक्षण समिती  सल्लागार आपा शिरसाठ, मुख्याध्यापक पोपट भोये, शिक्षकवृंद व विद्यार्थी  यांनी या मदतीचा स्विकार करून San Computek चे आभार व्यक्त केले.त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






प्रवेशोत्सव...शाळेचा पहिला दिवस! 17 जून 2019
======================
जि.प.प्राथ.शाळा-ओझरखेड,ता.दिंडोरी

        दीर्घकालीन सुट्टीनंतर शाळेची घंटा झाली अनं चिमुकल्यांनी रंगीबेरंगी कापडं झुगारून शालेय गणवेश परिधान करत शाळेत हजर झाली. सिनिअर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन नवागतांचे स्वागत त्यांच्या घरी जाऊन केले. लगेचच त्यांना ट्रॅक्टर ट्राॅलीत बसवून ढोल-ताश्याचा गजरात मिरवणूक काढली व त्यांना सन्मानाने शाळेत आणून प्रवेशित केले.
    शाळेतील वर्गात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या पाउलखुणा कागदावर घेत असताना सुरवातीला नवीन चिमुकले घाबरले पण स्वतःच्या पाऊलांचे ठसे बघितल्यावर खुदकन गालात हसले. यावेळी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व सदस्य यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
   

दुपारच्या भोजनात सोमवारच्या मेनूसह शिरा देण्यात आला. पहिलीच्या वर्गात गाणे- गोष्टी तर इतर वर्गात सराव अभ्याससह गप्पा-गोष्टी झाल्यात.खरेतर आज विद्यार्थी सकाळपासूनच शाळेत आलेले होते तरी सायंकाळपर्यंत फ्रेश दिसत होते. पहिलीच्या चिमुकल्यांची तर बातच न्यारी.पहिल्यांदा आठ तास नवीन वातावरणात वावरत होते.शाळेतील शिक्षकांनी नवागतांचे स्वागत करून आयुष्याच्या शिक्षण प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.

आम्हा सर्वांसाठी आजचा प्रवेशोत्सव आनंददायक होता.

           विश्वास पाटोळे 
               शाळा-ओझरखेड 
                        ता.दिंडोरी